Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोना: पावसाळ्यात विषाणूचा संसर्ग वाढणार की कमी होणार?

कोरोना: पावसाळ्यात विषाणूचा संसर्ग वाढणार की कमी होणार?
, गुरूवार, 4 जून 2020 (08:53 IST)
नूतन ठाकरे
गेल्या तीन महिन्यांपासून भारतात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली आहे.
 
आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.
 
मात्र, ही भीती कितपत खरी ठरू शकते? कोरोना विषाणू हा हवामान सापेक्ष आहे का? भारतातल्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा टिकणार नाही, असा जो अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला तो तर खरा ठरलेला दिसत नाही. मग पावसाळ्याविषयीचं भाकित खरं ठरू शकतं का?
 
पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका कसा होऊ शकतो? कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करताना पावसाळ्यात इतर कुठल्या अडचणी येऊ शकतात? आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणूपासून बचावासाठी पावसाळ्यात आपण कशी काळजी घेतली पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
 
पावसाळ्यात कोरोना विषाणूचा धोका अधिक वाढणार का?
हवामानाचा कोरोना विषाणूच्या प्रसारावर परिणाम होतो, असं सुरुवातीच्या दिवसांमध्ये सांगितलं जात होतं. काहींचं म्हणणं होतं की, उन्हाळा सुरू झाल्यावर कोरोना विषाणूचा फैलाव कमी होईल.
 
तापमान वाढल्यानंतर कोरोना विषाणूचं स्वरूप बदलू शकतं, असा दावा काही शास्त्रज्ञांनी केला होता. मात्र, भारतापुरता विचार केला तरी असं काही झालेलं दिसलं नाही. आता पावसाळा तोंडावर आहे आणि पावसाळा आला की पावसाळ्यातल्या आर्द्र वातावरणात कोरोनाचा फैलाव जास्त होईल, अशी भीतीही काहींना वाटतेय.
 
मात्र, कोरोना व्हायरस जगभरात 180 हून जास्त देशांमध्ये पसरला आहे. यात ग्रीनलॅंडसारखे थंड प्रदेश आणि आखातासारखे वाळवंटी देश एकसारखेच या रोगाने ग्रस्त आहेत. साथीचे रोग ऋतूनुसार येत नाही. उदाहरणार्थ-स्पॅनिश फ्लू उन्हाळ्यात आला होता. मात्र सामान्य फ्लू साधारणपणे पावसाळा किंवा हिवाळ्यात डोकं वर काढतो. विषमज्वर उन्हाळ्यात डोकं वर काढतो. तर गोवर उन्हाळ्यात कमी होतो. मात्र उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गोवर उन्हाळ्यात दिसून येतो.
 
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी पाऊस आणि कोरोना विषाणू याच्या संबंधाबाबत अजून कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार कोव्हिड-19 पसरवणारा Sars-CoV-2 विषाणू उष्ण आणि दमट, शीत आणि कोरडा अशा सर्वच प्रकारचं हवामानात पसरू शकतो.
 
त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचावासाठी हवामानावर अवलंबून राहू नका, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. तसंच थंड हवामान कोरोना विषाणू किंवा इतर रोगांचा नाश करू शकते, असं मानण्याचं कोणतंही कारण नाही. बाहेरचं तापमान कितीही असलं तरी माणसाच्या शरीराचं तापमान 36.5 ते 37 अंश सेल्सियसच्या दरम्यान असतं. त्यामुळे एकदा का विषाणूने शरीरात प्रवेश केला ती त्याला अनुकूल असलेलं तापमान त्याला मिळतं, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
 
पावसाळा आणि कोरोना विषाणू यांचा थेट संबंध नसला तरी पावसाळ्यात हवेतली आर्द्रता वाढते. त्यामुळे विषाणू पसरण्यासाठी पूरक वातावरण मिळतं, असं विषाणूतज्ज्ञ डॉ. अनंत भान सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना डॉ. भान म्हणाले, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उन्हाळ्यात उष्ण हवामानात हा विषाणू नष्ट झाला नाही तर पावसाळ्यातलं थंड वातावरण आणि हवेतली वाढलेली आर्द्रता यामुळे विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरेल असं नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे काही पुरावे नसले तरी तो पावसाळ्यात कमी होईल, याचेही पुरावे नाहीत. त्यामुळे काळजी ही घ्यावीच लागणार आहे."
 
बीबीसीशी बोलताना अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी म्हणतात, "कोरोना विषाणूची लागण होण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला आहे डायरेक्ट ट्रान्समिशन. म्हणजे कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकली किंवा खोकली आणि त्यावेळी तुम्ही तिच्या जवळ उभे असाल तर तिच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू तुमच्या शरीरात संक्रमित होतो. दुसरा इनडायरेक्ट ट्रान्समिशन. म्हणजे कोरोनाग्रस्ताच्या शरीरातून शिंतोड्यांच्या माध्यमातून बाहेर पडलेला विषाणू ज्या पृष्ठभागावर पडतो त्या पृष्ठभागाला इतर कुणी स्पर्श केल्यास पृष्ठभागावरचे विषाणू त्या व्यक्तीच्या हाताला चिकटून त्याद्वारे त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होऊ शकते."
 
"हे दुसऱ्या प्रकारातलं ट्रान्समिशन तापमानावर अवलंबून असतं. डायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये हवामानाचा काही संबंध नसतो. मात्र इनडायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये हवेतल्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू एखाद्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकून राहू शकतो. त्यामुळे त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. मात्र, याचा अर्थ पावसाळी वातावरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढेल असं नाही. पावसाळ्यात व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, असं कुठल्याही संशोधनात सिद्ध झालेलं नाही. मात्र, पावसाळ्यात इतर आजार डोकं वर काढत असतात. त्यामुळे यापुढे रुग्ण आल्यानंतर त्याला इतर कुठल्या आजाराची लक्षणं दिसत आहेत का, हे तपासून त्यादृष्टीने चाचण्या कराव्या लागणार आहेत."
 
पावसाळ्यातील आव्हानं
त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोरोना विषाणूला पूरक वातावरण मिळून त्याचा फैलाव वाढेल, अशी शक्यता नसली तरी पावसाळ्यात डोकं वर काढणाऱ्या इतर आजारांचं मोठं आव्हान असणार आहे.
 
पावसाळ्यात दमा आणि इतर श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे हा देखील वाढेल, अशीच शक्यता जास्त असल्याचं विषाणूतज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा यांचं म्हणणं आहे.
 
बीबीसीशी बोलताना डॉ. गिलाडा म्हणाल्या, "पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढतो. त्यामुळे दमा असणाऱ्यांचा आजार बळावतो. त्यामुळे श्वसनाचा आधीच कुठलातरी आजार असणाऱ्या लोकांना जर कोव्हिड-19 ची लागण झाली तर गुंतागुंत अधिक वाढते आणि म्हणूनच दमा किंवा श्वसनाचे इतर आजार असलेल्यांना पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. औषधं वेळेवर घ्या. फिजिकल डिस्टंसिंग पाळा. विशेषतः घरातल्या वयोवृद्धांनी सर्व ती काळजी घेतलीच पाहिजे. "
 
पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचं प्रमाण वाढल्याने कॉलरा, जुलाब, कावीळ असे दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. तसंच डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पारेसिस, स्वाईन फ्लू यासारखे साथीचे आजाराही डोकं वर काढतात. मुंबईसारख्या किनारपट्टीच्या भागांमध्ये लेप्टोची साथ दिसते. तर डेंगीसारखा आजार शहरात वाढत असल्याचं दिसतं.
 
याविषयी सांगताना डॉ. अनंत भान म्हणतात, "पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, दूषित पाण्यामुळे होणारे आजार उद्भवतात. मात्र, सध्या कोव्हिड-19 वर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे कोव्हिड-19 व्यतिरिक्तच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि तसं झालं तर त्यांचीही साथ पसरण्याची मोठी भीती आहे."
 
"आज आरोग्य आणि शासकीय कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपासून कोव्हिड-19 आजाराला आळा घालण्यासाठीच्या इतर कामात आहेत. हे तेच कर्मचारी आहेत जे पूर्वी मलेरिया प्रतिबंधात्मक उपायांवर काम करायचे, जंतूनाशकांची फवारणी करायचे. शहरात पाणी साचू नये, यासाठी नालेसफाईची काम करायचे. मात्र, यावर्षी ही पावसाळ्यापूर्वीची आणि पावसाळ्यातली कामं झाली नसतील तर पावसाळ्यात उद्भवणारे आजार वाढतील. त्यामुळे कोव्हिड-19 सोबतच इतर आजारांवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढे असेल."
 
लॉकडाऊन शिथील केल्याने वाढणार धोका
संपूर्ण भारतातच आता लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील करण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन वगळता सर्वच झोनमध्ये मॉल, शैक्षणिक संस्था, बागा असे काही मोजके अपवाद वगळता सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी जास्त लोक घराबाहेर पडल्यावर एकमेकांशी संपर्क येणारच. तो टाळता येणार नाही.
 
डॉ. गिलाडा सांगतात, "लॉकडाऊन जसजसं उघडले कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसणार आहे. लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, कामाच्या ठिकाणी एकत्र येतील. त्यामुळे शारीरिक संपर्क वाढून हा आजार अधिक वाढणार आहे."
 
डॉ. भान सांगतात, "मुंबईसारख्या शहरात सोशल डिस्टंसिंगचं मोठं आव्हान आहे. लॉकडाऊन उघडल्यामुळे लोकांचा संपर्क वाढेल. पण त्याचप्रमाणे अनेक वस्त्यांमध्ये घरं दाटीवाटीने आहेत. अनेक वस्त्यांमध्ये दिवसातून एकदा पाणी येतं. त्यामुळे पाणी भरण्यासाठी गर्दी असते. सर्वांसाठी एकच स्वच्छतागृह असतं. त्याचाच वापर करावा लागतो. त्यामुळे असे सगळे अडथळे दूर करणं, अवघड आहे. अशावेळी सरकारने हस्तक्षेप करून उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरात जाऊन ट्रेसिंग करणंही अवघड असणार आहे."
 
पाण्याने कोरोना विषाणू वाहून जाईल का?
कोरोना विषाणू पुठ्ठ्यावर 9 तास जिवंत असतो. तर प्लॅस्टिक, स्टिलसारखे धातू यावर 9 दिवसही सक्रीय असू शकतो. मात्र, पावसाळ्यात पाऊस पडून हा विषाणू वाहून जात निष्क्रिय होत असेल का? असा प्रश्न पडला जॉर्जियातले हवामान विषयाचे प्राध्यापक आणि वातावरण विषयक शास्त्रज्ञ मार्शेल शेपहर्ड यांना. याचं उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 
युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअर एपिडेमॉलॉजी डिपार्टमेंटच्या संस्थापक आणि शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर होर्ने म्हणतात, "पाऊस पडल्यामुळे कोरोना विषाणू वाहून जाईल किंवा त्याची तीव्रता कमी होईल, असं वाटत नाही. माझ्या आकलनाप्रमाणे साबणाने हात धूत असताना या क्रियेमध्ये पाण्यापेक्षा साबण अधिक महत्त्वाचा आहे. कारण साबणामुळे कोरोना विषाणूवरचा प्रोटीनचा थर तुटून विषाणू निष्क्रिय होतो."
 
मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या ग्लोबल हेल्थ, मेडिसिन अँड एपिडेमिऑलॉजीचे प्राध्यापक आणि डीन प्रा. जॅरेड बॅटेन म्हणतात, "एखाद्या पृष्ठभागावर पाऊस पडला तर त्यामुळे कोरोना डायल्युट होऊ शकतो किंवा वाहून जाऊ शकतो. त्यामुळे नुकताच पाऊस पडून गेला असेल तर एखाद्या बागेतल्या बेंचवर बसण्याआधी तिथे कोरोना असेल का, असा विचार न करता मी निश्चिंतपणे बसेन."
 
या दोन्ही वक्तव्यांचा अभ्यास केल्यानंतर शेपहर्ड म्हणतात, "बॅईटेन यांनी म्हटल्याप्रमाणे पावसामुळे पृष्ठभागावरून कोरोना विषाणू वाहून जाऊ शकतो किंवा काही प्रमणात डायल्युट होऊ शकतो. मात्र, पावसामुळे कोरोना नष्ट होऊ शकत नाही."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले